Archive

Posts Tagged ‘मराठी’

एक दिवस सावित्रीचा

मार्च 8, 2010 4 comments

या, सावित्रीबाई आलात?
कशाने आलात पुण्याहून डेक्कननं की सिंहगड?
डेक्कनची अवस्था बघवत नाही म्हणता?
चालायचंच हॊ, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं
काय घेणार? कापुचीनो की थंड बर्फ़ाळलेलं बाटलीतलं
तुमच्याच देशातलं ज्वलंत पाणी?
यानंतर आपण सरळ मल्टिप्लेक्समधल्या-
स्क्रीनवर छान गारेगार एसी मध्ये बसून
“स्त्री- शोषण एक सामाजिक प्रश्न” बघणार आहोत.
तुमच्याशी थेट संवाद दूरध्वनीवरुन भगिनींना
साधता येणार आहे……

काय म्हणता? प्रत्यक्ष भेट?
हो आहे ना, महिला मंडळात साडी ड्रेपिंगवर कार्यशाळा–
त्यात तुमच्या नऊवारीवर माझे भाषण आहे. प्रात्यक्षिकही आहे.
त्यानंतर ताज मध्ये लंच-

तुम्ही हातात लेखणी दिलेली छकुली
आता साक्षर नी प्रौढ झाली आहे- काळजी करु नका
तळागाळातल्या स्त्रिया? त्या आता उरल्याच नाहित.
गेल्यात कुठल्यातरी मोर्चात सामील व्हायला,
कोणी मंत्री येणार आहेत, मिळतात दहा दहा रुपये प्रत्येकिला
किती समजावं लागतं बाई तुम्हाला.

अम्रुता, जेसिका लाल , खैर लांजी ही कुठली नावं?
नका हो अशी भाषा बोलु प्लिज…..
आम्ही सुशिक्षीत मांडतो आहोत ना त्यांचे प्रश्न ,
चर्चा सत्रे , मेळावे काव्यसम्मेलने आयोजित करुन
तुम्ही नका काळजी करु.

काय म्हणताय? समुद्रावर फिरायला जायचंय?
हं…. तो मात्र बापडा तस्साच आहे हं,
बसलाय बापडा कित्येक वर्षाच्या जुन्या खुणा,
अंगावर बाळगीत, अन नविन वार सोसत
चला , तुमच्याबरोबर दिवस घालवल्यावर,
“एक दिवस सावित्रीचा” या प्रोजेक्टवर रिपोर्ट
व्ही. सी. ना द्यायचाय.

तुम्हाला नाही हो कळायच्या अश्या गोष्टी.
या सावित्रीबाई आलात?

मध्यमवर्गी गार्गी……

मार्च 7, 2010 4 comments

“एखाद्या स्त्रीने कागद हाती घेतला की आमच्या वडील माणसांची अमर्यादा होने.जणू काही तिने अत्यंत लाजिरवाणी गोष्ट केली. एखादे आप्तेष्ठांकडून तिचे नावाने टपालातून पत्र आले की घरातील माणसांना आपली अब्रू गेलीसे वाटत. एखाद्या वर्तमान पत्रात एखादीचे नांव प्रसिध्द झाले, लेख प्रसिध्द झाला की घराची अब्रू कमी केल्याचा डोंगराएवढा आरोप तिचे माथी बसलाच म्हणून समजावे…..”

हे उदगार २०व्या शतकाच्या आरंभीला कथालेखन करणाऱ्या अग्रलेखिकांपैकी काशीबाई कानिटकर ह्यांचे आहे. आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी स्त्रीची सर्वक्षेत्रातील प्रगती पाहाता हे उदगार आपल्याला अचंबित करतात.

आज कोणतेही क्षेत्र असे नाही की ज्या क्षेत्रात स्त्रीने नुसते स्वतःचे पाउल ठेवले नाही तर तिथे स्वतंत्र कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. ही अत्यंत आनंदाची मनाला उत्साह आणण्यासारखी बाब आहे.परंतू  पुन्हा प्रश्न उभा रहातोच तो असा की स्त्री खरंच समग्र दृष्टीने स्वतंत्र झाली आहे कां? की ’न स्त्री स्वातंत्र्यर मर्हती’ अशीच तिची अवस्था आहे ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास मागिल कालखंडातील साहित्याचा मागोवा घेतला तर असे लक्षात येते की अगदी मौखिक वांड्गमयापासून ते लिखित स्वरुपाच्या वांड्गमयाचा अगदी आजचा काळ घेतला तर त्याचे उत्तर अजुनही नकाराच्या परिसीमा ओलांडू शकल्या नाही असेच खेदाने म्हणावेसे वाटते.

अगदी मौखिक वांड्गमयाचा म्हणजेच परंपरेतून आलेल्या कहाण्यांचा विचार केला तर सर्व कहाण्यांत स्त्रीने काय करावे , काय करु नये, इत्यादीचा पाढा वाचला आहे, परंतू तिथेही आपल्या व्यक्तिमत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या स्त्रियांची  धडपड स्पष्ट्पणे लक्षात येते. उदा: खुलभर दुधाच्या कहाणीतील राजाचा आदेश न पाळणारी म्हातारी, श्रीमंतीला चटावलेल्या भावाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी शुक्रवारच्या कहाणीतील  बहिण इत्यादी नंतरच्या काळात देखिल ’ डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी’ म्हणणारी जनाबाई, किंवा परिपक्व बुध्दीचे प्रदर्शन आपल्या कूट अभंगाद्वारे करणारी मुक्ताई. आदिम काळापासूनच स्त्री आपला विचारांचा ,व्यक्ततेचा वेगळा विचार करणारी ठरली हे निश्चीत. वैदिक काळात सुध्दा गार्गी मैत्रेयीचा विचार केल्यास स्त्रीला मान होता, स्वतंत्र स्थान होते, हे दिसते.

कोणत्याही समाजाची सांस्कतिक पातळी ही त्या समाजातील स्त्रियांची परिस्थिती कशी आहे ह्यावरुन ठरत असते.वेद्काळात उच्चस्थान प्राप्त करणाऱ्या स्त्रीचा दर्जा पुढील काळात खालावला गेला. याची कारणमीमांसा अनेक प्रकारे करता येईल. उदाहरणार्थ, राजकिय घडामोडी, मोगलांचा आक्रमण काळ इत्यादी. यामुळे स्त्रीच्या मनाची व बुध्दिची वाढ खुंटवुन टाकण्यात आली. व स्त्री मनुस्मृती काळात मोहवादाच्या भोवऱ्यात  अडकली. तिच्या भोवती विषयासक्तिची बेडी पडली. व वेद काळात असलेली स्वतंत्रतेची तिची प्रतिमा पुसली गेली.  बाल विवाह , विधवा विवाह बंदी अशा अनेक रुढी प्रथांमधे अडकली. पर्यायाने समाज तिच्या दुर्दशेला कारणीभूत ठरला.

या सगळ्या परिस्थितीला छेद देणारा इंग्रजी शिक्षणाचा कालखंड पुन्हा स्त्रीची प्रतिमा उंचावणारा ठरला. तेंव्हापासून ते आजपर्यंत स्त्रियांची शिक्षण क्षेत्रातील प्रगती, तिच्या अस्तित्वाच्या उभारणीसाठी झालेली कायद्यातील प्रगती आदी  घडामोडींकडे पहाता तिची परिस्थिती बरीच सुसह्य झाली आहे. अर्थार्जनाच्या हक्कासाठी सुध्दा स्त्रीला बराच लढा द्यावा लागला.स्त्री अर्थार्जनाच्या क्षेत्रात उतरली की कुटुंबाकडे दुर्लक्ष होते ,मातृत्वाची जबाबदारी नीटपणे पार पाडता येणार नाही असाही दृष्टिकोन पुरुषांचा होता. परंतू या बाबतीत गम्मत अशी आहे की हा दृष्टिकोन फक्त मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रीच्या बाबतीतच तपासत होते. कारण श्रमिक वर्गातील स्त्री कित्येक वर्षापासून हे काम करतेच आहे. तिच्या बाबतीत हा प्रश्न कधी उद्भवलाच नाही.म्हणजेच काय , पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी सुशिक्षित स्त्री नको होती. सुरुवातीला स्त्रीला परिचारीका, शिक्षीका एवढ्याच व्यवसायापुरते मर्यादित केले गेल. आता मात्र परिस्थिती बदलली आहे. मतदानाच्या हक्कासाठी, जसा अमेरिकेतील स्त्रियांना लढा द्यावा लागला,तसा लढा देणे भारतीय स्त्रीच्या वाट्याला आला नाही. कारण इंग्रजांच्या कृपेमुळे तो हक्क आपोआपच पदरात पडला. इथपर्यंत स्त्री ची सामाजिक वाटचाल पाहिल्यावर मी पुन्हा लेखाच्या आरंभी दिलेल्या मुद्याकडे येउ इच्छिते की एवढे सगळे होऊनही स्त्री खऱ्या अर्थाने , सर्वांगाने, विचाराने स्वतंत्र झाली कां?? या प्रश्नावर विचार करायला हवा.

काचापाणी या खेळातल्या काचा जरी बदलल्या , तरी काच अजून तसाच आहे. याचे उत्तर शोधण्यासाठी कवयित्री ईंदीरा संत यांच्या ’मध्यमवर्गी गार्गी’ या कवितेतल्या काही ओळी देते , बघा तपासून स्वातंत्र्य नावाचा दगड आपल्यापासून किती लांब आहे ते!

मध्यमवर्गी गार्गी

एक दगड कष्टाचा
एक दगड त्यागाचा
वात्सल्याचा थर
घाटासाठी वापरायचा
तिचेच नांव गृहलक्ष्मी….

कातरवेळी दमून भागून
उजव्या डाव्या हातातील
पर्स, पुडकी सांभाळित
घरी परतणारी ती
गार्गी

पर्सच्या हुद्यांबरोबरच
सांभाळून आणलेली
त्या वाक्यांची लाकडे चुलीत लावते….
( इथे वाक्य म्हणजे स्त्रीच्या प्रगतीची पेपरवरील आकडेवारी होय)

मग कुकर, मग पोळ्या, मग फोडण्या,
थोरापोरांच्या मनधरण्या,
मग नोकरांच्या काचण्या…..
शिजवणारी ही तीच
शिजणारी तीच
मध्यमवर्गी गार्गी……

अस्तित्व

मार्च 6, 2010 4 comments


माहीत होते काटे असतात
तरीही मी गुलाब झाले
माहीत होते जन्म चिखलात
तरीही मी कमळ झाले

माहीत होते अमावस्या असते
तरीही मी पौर्णिमा झाले
माहीत होते डाग असतात
तरीही मी चन्द्र झाले

माहीत होते वारा सुटतो
तरीही मी सुगंध झाले
माहीत होते पाने गळतात
तरीही मी वसंत झाले

माहीत होत दाह सुर्याचा
तरीही मी धरणी झाले
माहीत होता बाण पारध्याचा
तरीही मी हरिणी झाले

माहीत होते प्रेमापायी
जगात मी वेडी ठरले
फक्त तुझ्याच साठी मी
माझे अस्तित्व हरवून गेले

स्पर्श..

हळुवार स्पर्शाचा
प्रेमाच्या नजरेचा
उचंबळणाऱ्या भावनांचा
मजभोवतीच्या रुंजीचा
कळत होता परवा पर्यंत
स्पर्श तुझ्या शब्दांचा…

चैतन्यमयी दिवसांचा
आनंदमय रात्रींचा
ह्रदयांच्या स्पंदनांचा
हव्याशा सोबतीचा
कळत होता परवा पर्यंत
स्पर्श तुझ्या शब्दांचा

बदलत्या जाणिवेचा
मदन्मत्त अहंकाराचा
निरर्थक संवादाचा
कळुन न कळल्याचा
जाणवत नाही आज
स्पर्श तुझ्या शब्दांचा

विखारी नजरेचा
जरबेच्या देहबोलीचा
चुकलेल्या बेरजेचा
मांडलेल्या वजाबाकीचा
जाणवत नाही आज
स्पर्श तुझ्या शब्दांचा