Archive

Archive for the ‘Uncategorized’ Category

कॅन्व्हास

मार्च 6, 2010 10 comments

माझं घर आहे आपलं साधं सुधं पण मोकळं. हवे्शीर आणि भरपूर उजेडाचं. त्यात सुख आहे, दुःख आहे, आशा अपेक्षंचे ओझे आहे. राग , लोभ, हेवा मत्सर सारं काही भरुन आहे. कशाचीही कमतरता नाही. सगळ्या सर्वसामान्य  लोकांचे असते तसे आहे. पण माझ्या घराला एक वेगळाच कोपरा आहे. जो दिसतो सगळ्यांना,  पण मला जसा भासतो तसा सगळ्यांनाच भासेल असे नाही.  अगदी अम्रुता प्रीतम ने सांगितल्या प्रमाणे मी माझ्यासाठीच  राखून ठेवला आहे. हा कोपरा आहे माझ्या घराच्या दाराच्या चौकटीतला कॆनव्हास.हो! हो! त्याला मी कॅन्व्हास असेच नांव दिले आहे, कारण तो दर क्षणाला वेगळेच चित्रं रंगवत असतो.

अगदी पहाटे झुंजू मुंजू च्या वेळी मी   लवकर उठुन त्याच्या जवळ येउन बसते, आणि म्हणते तुझ्यावर कुठलं चित्रं रेखाटलय ते? तो हसतो , वाऱ्याच्या झुळुकीचा सुखद स्पर्श मला करुन जातो. म्हणतो, आधी हे घे,प्राजक्ताची फ़ुले माझ्या पदरात घालीत सुगंधाची शाल पांघरतो. मी ही फुलते, बहरते,  जुईच्या सुगंधाची उदबत्ती लावीत तो जणु दिवसाची   सुरुवात करतो.

क्षितिजाच्या निळ्या सावल्या, बॅकग्राउंडवर काळपट हिरव्या झाडांची हालचाल जाणवते. त्याच्या ह्या आनंदात गुलाबी ऊषा केशरी पैंजण वाजवीत हलकेच केंव्हा सामिल होते ते त्यालाही कळत नाही. ती ही अगदी मैत्रीणीशी हातात हात घालुन फ़ुगडी खेळावी तसे त्याच्याशी खेळु लागते. त्यांचा खेळ सुरु असताच मी   फ़रशीवर पाणी शिंपडुन दाराशी सुबक रांगोळी घालते,तर पाठिमागुन सुर्याचा   पहिला किरण माझ्या पदराशी अगदी मांजरीसारखा घोटाळतो. कॅन्व्हास म्हणतो , बघ ना जरा मागे वळुन , मी नविन चित्र रेखाटलं आहे तुझ्यासाठी, का माझाकडे पाठ करुन बसली आहेस?

अरे हो! जरा थांब मला माझी  कामं करु देशिल की नाही? तुझे आपले काहीतरीचं लहान मुला सारखे. सारखं तुझाशीच खेळायचं का रे? तरीपण  त्याच्याकडे बघितल्याशिवाय माझे समाधान होत नाही. आता त्याच्या खेळात सुर्यनारायणानेही भाग घेतला असतो. तो कॅन्व्हास वर रंगाची उधळण करीत असतो. वाऱ्याचेही त्यांच्या बरोबर हितगुज चालले असते. मला त्यांचा मोह सोडवत नाही , पण घरातली कामे खुणावत असतात. आंघोळ वेणी करुन तुळशीला पाणी  घालण्याच्या निमित्ताने मी पुन्हा त्यांच्यात सामिल होते.

आता कॅन्व्हास वर वेगळे चित्रं असते. सोनेरी ऊन्हाचे कवच ल्यायलेली झाडे, गवतावरचे चमकणारे दव बिंदु.नक्षत्रासारखं फुलुन आलेलं  फुलांचं झाड, गुलाबी रंगाची गुलबक्षी, जाई , जुई, शेवंतीने घातलेला सुवासाचा सावळा गोंधळ चालला असतो.

माझ्या कॆनव्हास वर केवळ रंग चित्रेच असतात असे नाही,सोबत पक्षांच्या गाण्याची टेपही वाजत असते.लगेच कॅन्व्हासआपली कॊलर टाईट करीत मला विचारतो – बघितलय का असं चित्र कधी की ज्यात संगीतही आहे? नाही ना? मी आहेच मुळी असा रंग वेगळा.मी आपली त्याचे ऐकुन घेत माझं काम सुरु ठेवते. मूलांचे डबे, शाळेची घाई. ऒफ़िसची तर तह्राच न्यारी.अगदी पेन रुमाल हातात द्यावा लागतो.

सगळ्यांना त्यांच्या कामाला लावल्यावर मला थोडीशी फ़ुरसद मिळते, तोवर कॆनव्हास रागाने लाल झाला असतो. अरेच्या तुला रागवायला काय झालं? अरे मी जरी कामात असले तरी ह्या खिडकीतुन- त्या खिडकीतुन माझं लक्षं होतंच की. पण रुसलेल्या बाळासारखा हा लाल पिवळा. धगधगत्या पंगाऱ्याने पेट घेतलेला असतो.त्यातुन ज्वाळा निघत असतात.

गुलमोहरानेही त्याचीच साथ दिलेली असत. पक्षी बिचारे हिरव्या पानांच्या काळ्या सावलीशी बिलगले असतात. तिथुनही हळुच कुचूकुचू एकमेकांशी बोलत असतात. प्राजक्ता, जाई , जुई सगळ्या पोरी खेळुन थकुन माना टाकुन बसतात. मीही जरा पदराने वारा घेत बसते त्यांच्यापाशी जरा वेळ. “काय रे तुझी ही तह्रा, किती हा बटबटितपणा, तुझ्या चित्राशी विसंगत अशी ही पाण्याची टाकी , आता अगदी ऊठुन दिसते”. आजुबाजुच्या इमारतींचे रंग सुद्धा तु आपल्यात सामावुन घेतलेस.चालायचंच, सगळी चित्रं काही सुसंगत थोडिच असतात? थोडी विसंगती त्यात असावी लागते.

थोड्यावेळाने तो सुद्धा वामकुक्षी घेतल्यासारखा निःशब्द होतो. नाही म्हणायला मधुनच एखादी टिट्वी त्याच्या समाधीचा भंग करीत असते.मधुनच कोकिळेला पण आपल्या रागंदारीचा मोह आवरत नसतो.  माझंही  दुपारचे निवांत चालले असते. संध्याकाळची एकच घाई नको म्हणुन स्वयंपाकाची हळू हळू तयारी सुरु असते. रजनीला पदराशी  बांधुन संध्याकाळ नाचत ऊडत येते आणि कॅन्व्हासचा रुसवा जातो. त्याचं खेळकर रूप पुन्हा एकदा प्रगट होतं. संध्या रजनीने सोबत निशिगंधाला पण आणले असते. तिचा श्रुंगारही अजून आटोपला नसतो. धुळीचा सुगंध आसमंत व्यापून टाकतो. पक्षांसोबत मुलांचापण छप्पा पाणी रंगात आलेला असतो.

आता मात्र कॅन्व्हासचा चेहेरा   काळवंड्लेला असतो. अगदी प्रणय रंगात आल्यावर प्रियेनं काढता पाय घ्यावा त्या प्रमाणे तो म्लान होतो, उदास होतो,. हळू हळू तो निओन साईन्सच्या झगमगाटामागे लपू लागतो.

एका वेगळ्याच रात्रिच्या जगाचा उदय झालेला असतो. आणि माझाकॅन्व्हास कोलमडून जातो. हळूच त्याचे सांत्वन करीत त्याला मी समजावते, अरे, तुझा प्रियकर रवी गेला तरी रजनीच्या प्रियकरा , मंद आणि शांत उजेडात तु न्हाऊन निघशिल, तुझ्यावर चांदण्यांची बरसात होईल.नीज आता.

कॅन्व्हासचा प्रियकर जरी गेला तरी आता माझ्या प्रियकराची येण्याची वेळ झाली आहे. मी सुद्दा तुझ्यासारखीच एक कॅन्व्हासच तर आहे. माझे रूप खुलायला प्रियकराने रंग भरणं आवश्यक आहे.

प्रवर्ग: Uncategorized