रंगावली
रेखिते मी रंगावली,
जोडून नक्षत्रांचे थेंब,
मोडू नको सखया,
क्षणभर तिथेच थांब
केशरी मोरपिशी, पिवळा,
लाल, हिरवा, जांभळा,
दिधले तबक हे इन्द्रधनूने,
भरते रंग मी नजाकतीने
फ़ेडू कसे मी त्यांचे पांग?
क्षणभर तिथेच थांब
डबा निळ्या रंगाचा,
गडद शांत रातीचा
दे ना तु हाती,
त्यायोगे कर जुळती,
करुनी हात लांब ,
क्षणभर तिथेच थांब
लाल गुलाबी हवा,
फुलांसाठी रंग नवा,
का बसतो अडुन ?
माग ना तिच्याकडून,
उभी पश्चिमेला सांज,
क्षणभर तिथेच थांब
ती एक रेघ शेवटाने,
जोडुया जर्द विजेने,
शिंपला वर्ख चंद्राने,
आले पुर्णत्व संगतीने
कशी दिसते सांग,
क्षणभर थांब.
सांग ना भास्कराला,
पुर्वेच्या तुझ्या मित्राला,
नकोस येऊ जरा वेळ
रंगला आता खेळ
वेळ उषेची साध,
क्षणभर तिथेच थांब
प्रतिक्रिया (0)
Trackbacks (0)
यावर आपले मत नोंदवा
ट्रॅकबॅक